Show Mobile Navigation
Lyrics
Showing posts with label Lyrics. Show all posts
Showing posts with label Lyrics. Show all posts

Tuesday, March 15, 2016

Arth leuni pahile akshar | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 6:30 PM
अर्थ लेउनी पहिले अक्षर

अर्थ लेउनी पहिले अक्षर
कधी उमटले कळले नाही,
करी घेतला वसा न चुकला
पाउल मागे वळले नाही


सुन्न खिन्न कातर एकांती
सोबत माझी अक्षर झाले
थिजलो जेव्हा सभेत भरल्या
तिथेही धावून अक्षर आले
कुठ्ला हा अनुबंध म्हणावा?
कोडे मजहे सुटले नाही

होऊन अश्रू कधी ओघळ्ले
कधी सांत्वने घेउन आले
रणरणत्या मध्यान्ही वेडा
मेघ होऊनी भिजवून गेले
आली गेली कैक वादळे
विण नात्यांची टिकली नाही

गेली उलटुन युगे अता त्या
अनुबंधासही अंकुर फुटले
प्रश्न अताशा पडे जगाला
मी कुठला अन अक्षर कुठले
परस्परांतच असे मिसळ्लो
नुरले आता विरळे काही

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

Tuesday, March 8, 2016

Shwasanchya talawari | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 5:30 PM
श्वासांच्या तालावरी

श्वासांच्या तालावरी स्वप्नांचे झुंबर हाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,


हव्यास नव्या दिवसाचा कधी पाठलाग ना सोडी
अन आस उद्याची वेडी थकलेले पाउल ओढी,

ती पहाट नाही दूर अंतरातून कोणी बोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,

झाकल्या मुठीतुन वाळू निसटावी तसेच होते
किती बांधून ठेवू म्हटले आयुष्य फरारी होते,

सरणाच्या फांदीवरही पालवी कोवळी डोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,

पाहिला जाळून तरीही सुंभाचा पीळ सुटेना
जगण्याचा तसाच गुंता गुरफटला जीव निघेना,

उसवावे तरी किती हे गुरफटणे नियमीत झाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

Sunday, February 28, 2016

Kar have tevadhe waar | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 5:30 PM
कर हवे तेवढे वार

नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो
मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो,


केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो,

रिचवुन सारे तुडुंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही आभार म्हणालो,

खेळवुनी मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडुन तिला तैयार म्हणालो,

रडलो नाही लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन याल्गार म्हणालो

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

Tuesday, February 23, 2016

Mi fasalo mhanuni | Sandeep Khare | Lyrics | Marathi Kavita

Asha-KD - 7:30 PM
मी फसलो म्हणूनी

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी


ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

[संदीप : या कवितेविषयी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, ................
पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ..........
ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. ......
आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता ]

Saturday, January 30, 2016

Kay re devaa | Sandeep Khare | Lyrics | Marathi Kavita

Asha-KD - 7:30 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)

काय रे देवा...

आता पुन्हा पाऊस येणार
आकाश काळ निळ होणार

मग मातीला गंध सुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपविणार
मग लपवूनही ते कुणालातरी कळावस वाटणार
मग ते कुणीतरी ओळखणार
मग मित्र असतील तर रडणार
नातेवाईक असतील तर चिडणार
मग नसतच कळल तर बर अस वाटणार
आणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार..

मग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार
मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार
मग त्याला एस. डी . वर्मन नी चाल दिलेली असणार
मग ते साहीर नी गायलेल असणार
मग ते लतानी गायलेल असणार
मग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार
मग ना घेण ना देण
पण फूकाचे कंदील लागणार
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार
मग त्याला आकाशाची आसव लगडणार
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग ऊर फुटून जावस वाटणार
छाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार
मग सारच कस मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार
बंद नाही पडणार
काय रे देवा...

पाऊस पडणार
मग हवा हिरवी होणार
मग पानापानात हिरवळ दाटणार
मग आपल्या मनाच पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार
पण त्याला ते नाही जमणार
मग त्याला एकदम खर काय ते कळणार
मग ते ओशाळणार
मग पुन्हा शरीराशी परत येणार
सरदी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडंमूडलेल आल शोधणार
एस . डी , च गाणही तोपर्यंत संपलेल असणार
रेडिओचा स्टॉक भरलेला असणार
मग तिच्या जागी ती असणार
मग माझ्या जागी मी असणार
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झलेल असणार

पाऊस गेल्या वर्षी पडला
पाऊस यंदाही पडतो
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार
काय रे देवा...

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

Saturday, January 23, 2016

Yein Swapnat Mitlya Dolyat | Sandeep Khare | Me Gato Ek Gane | Lyrics | Marathi Kavita

Asha-KD - 7:30 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Me Gato Ek Gane

Artists: Sandeep Khare

येईन स्वप्नात

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला?
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी

अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा?
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा?
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा?
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

Sunday, January 17, 2016

Door deshi gela baba | Sandeep Khare | Aggobai Daggobai | Lyrics | Marathi Kavita

Asha-KD - 7:30 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Song: Doordeshi Gela Baba
Singer: Sandeep Khare

Album: Aggobai Daggobai

दूरदेशी गेला बाबा

दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!


कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
'आता पुरे! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

Wednesday, October 14, 2015

Ayushyala Dyave Uttar | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 10:05 AM
आयुष्याला द्यावे उत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर



नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

गुरु ठाकूर



Reference: guruthakur.in

Sunday, October 11, 2015

Namanjoor | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Asha-KD - 10:34 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Namanjoor
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

नामंजूर

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन्‌ वार्‍याची वाट पाहणे - नामंजूर!

मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा!
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्या हाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रुचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे-फुगवे ..... भांडणतंटे ..... लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

नीती, तत्त्वे ..... फसवी गणिते! दूर बरी!
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर!

_ संदीप खरे [By Sandeep Khare]

Thursday, October 8, 2015

Tujhya Majhya Save Kadhi | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Asha-KD - 8:30 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Namanjoor
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही


पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

अता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खूणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

_  संदीप खरे [By Sandeep Khare]

Tuesday, October 6, 2015

Diwas ase ki | Sandeep Khare | Diwas Ase Ki | Marathi Kavita

Asha-KD - 8:00 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Diwas Ase Ki
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Shailesh Ranade

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कोणाचा नाही


आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही,
या हसणे म्हणवत नाही

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे
परि मजला गवसत नाही

मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी,
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही

'मम' म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे,
या जगण्याला स्वप्‍नांचाही आता
मेघ पालवत नाही

_  संदीप खरे [by Sandeep Khare]

Sunday, October 4, 2015

Deva mala roj ek | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Asha-KD - 7:30 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Namanjoor
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर

कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा-दारूमध्ये कुठे असतो असर

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, 'कुठे दुखते तुला?'
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय? पडे जगाचा विसर

_  संदीप खरे

Friday, October 2, 2015

Nasates ghari tu jevha | Sandeep Khare | Ayushyavar Bolu Kahi | Marathi Kavita

Asha-KD - 7:00 PM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Ayushyavar Bolu Kahi
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासावीन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो

_  संदीप खरे

Thursday, October 1, 2015

Pratyekachi Ratra Thodi Aatun Aatun Vedi | Sandeep Khare | Ayushyavar Bolu Kahi | Marathi Kavita

Asha-KD - 10:20 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Ayushyavar Bolu Kahi
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी!

प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या मनातून काही तरी खोडी!

प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्‍नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाची छाती करे रोज तडजोडी!

फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या पानी कशी रोज खाडाखोडी?

_  संदीप खरे

Thursday, September 17, 2015

Me Hajar Chintanni | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Asha-KD - 9:24 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Namanjoor
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !


मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !

डोळ्यांत माझिया सूर्याहुनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते-
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !

मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या श्यामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!

_  संदीप खरे

Monday, September 14, 2015

Kitik Halve Kitik Sundar | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Asha-KD - 9:32 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Namanjoor
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर


अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्वासांनी थांबून जावे
परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्‍मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर

_ संदीप खरे

Saturday, September 12, 2015

Mi Morcha Nela Nahi Mi Samphi Kela Nahi | Sandeep Khare | Ayushyavar Bolu Kahi | Marathi Kavita

Asha-KD - 9:27 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Ayushyavar Bolu Kahi
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare

मी मोर्चा नेला नाही ..... मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही


भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्‍त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही !

_ संदीप खरे

Thursday, September 10, 2015

Kase Sartil Saye | Sandeep Khare | Diwas Ase Ki | Marathi Kavita

Asha-KD - 8:54 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Diwas Ase Ki
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare

कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना !

गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना दिसं सारा
रिते रिते मन तुझे उरे .....
ओठभर हसे हसे..... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे?
आता जरा अळिमिळी
तुझीमाझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! .....

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ..... सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! .....

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना ! .....

आता नाही बोलायाचे ..... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ..... विजेवर झुलू देत
तुझ्यामाझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! …..

_ संदीप खरे

Wednesday, September 9, 2015

Megh Nasta Veej Nasta | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Asha-KD - 8:52 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Namanjoor
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare & Salil Kulkarni

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले !


गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले !

एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले !

लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले?

पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !

भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्‍नी तुला जे भय तयांचे वाटले !

_ संदीप खरे

Tuesday, September 8, 2015

Man Talyat Malyat | Sandeep Khare | Diwas Ase Ki | Marathi Kavita

Asha-KD - 10:19 AM
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Diwas Ase Ki
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Shailesh Ranade

मन तळ्यात मळ्यात ..
जाईच्या कळ्यांत ..


मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात ..

उरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी तशात ..

इथे वार्‍याला सांगतो गाणी
आणि झुळुक तुझ्या मनात ..

भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभांत !

माझ्या नयनी नक्षत्र तारा
आणि चांद तुझ्या ....

_  संदीप खरे
Previous
Editor's Choice