Show Mobile Navigation
अनिल
Showing posts with label अनिल. Show all posts
Showing posts with label अनिल. Show all posts

Saturday, December 5, 2015

Kuni Jaal Kaa | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:14 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

कुणि जाल का

Song: Kuni Jal Ka Sagal Ka
Singer: Vasantrav Deshpande
Album: Vasantrang
Released: 1965
Composer : Yashwant Dev


कुणि जाल का, सांगाल का,
सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको,
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली

फार पूर्वीचा दिला तो
श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला
काळोख मी कुरवाळिला

सांभाळुनी माझ्या जिवाला
मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली
हलकी निजेची पाउले

सांगाल का त्या कोकिळा,
की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी
रात्र जागून काढली

_ अनिल [Anil]

Sunday, November 29, 2015

Ajuni Rusun Aahe | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:08 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

अजुनी रुसूनी आहे

अजुनी रुसूनी आहे,
खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ
की पाकळी हले ना!


समजूत मी करावी
म्हणुनीच तू रुसावे
मी हांस सांगताच
रडतांहि तू हसावे
ते आज का नसावे?
समजावणी पटे ना
धरिला असा अबोला
की बोल बोलवेना!

की गूढ काही डाव?
वरचा न हा तरंग!
घेण्यास खोल ठाव,
बघण्यास अंतरंग?
रुसवा असा कसा हा,
ज्या आपले कळेना?
अजुनी रुसूनी आहे,
खुलता कळी खुले ना!

आत्माराम रावजी देशपांडे
_ अनिल [By Anil]

Monday, November 26, 2012

Hoorup | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 9:44 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

हुरुप

कुठून येतो हा हुरुप मला?
खाली घातलेली मान वर होते
हारलेले हात पुन्हा लागतात मुठी आवळू

खचली कंबर पुन्हा ताठ होते
पेलण्यास ओझे
पावले थकली चढू पाहतात
अडल्या वाटा
कुठून येतो हा हुरुप मला !

शिणलेला आणि वैतागला मी
गोळा करताना वाळली पाने
मातीमध्ये हात मळवीत होतो
आहे का ह्या सुप्त मातीमध्येच
असे सामर्थ्य
स्पर्शानेच जागणारे चैतन्य ?

_ अनिल [By Anil]

Tuesday, October 2, 2012

Gaath | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:45 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

गाठ

आज अचानक गाठ पडे
भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

आज अचानक गाठ पडे

नयन वळविता सहज कुठे तरी
एकाएकी तूच पुढे
आज अचानक गाठ पडे

दचकुनि जागत जीव निजेतच
क्षणभर अंतरपट उघडे
आज अचानक गाठ पडे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टीस दृष्टी भिडे
आज अचानक गाठ पडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे
आज अचानक गाठ पडे

निसटुनी जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे
आज अचानक गाठ पडे!

__अनिल [By Anil]

Sunday, September 2, 2012

Sangati | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:46 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

सांगाती

हाती हात धरुन माझा
चालवणारा कोण तू?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती?

आवडतोस तू मला
की नावडतोस?
माझे मला कळत नाही !
एवढे मात्र जाणवते की
माझा हात धरुन असे चालवलेले
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना !
झिडकारुन तुझा हात
म्हणून दूर पळत जातो
बागडतो, अडखळतो, धडपडतो
केवळ तू कनवाळू पाठीशी उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतो
एरव्ही तू नसतांना
पडलो अन लागले तर
पुन्हा उठून हुंदडतो !

खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवू नकोस ना
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना !
बरोबरीचे वागणे हे खरोखरीचे आहे का?
खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दुरदुरुन, तुझा हात दूर करुन
मान उंच उभारुन
तुझ्याकडे धिटकारुन पाहू दे !

__अनिल [By Anil]

Saturday, August 25, 2012

Ek Diwas | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:47 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

एक दिवस

जीव लागत नाही माझा
असा एक दिवस येतो


कधी अधुनमधुन केव्हा
लागोपाठ भेट देतो

अशा दिवशी दुरावलेले
उजाड सारे आसपास

घर उदास बाग उदास
लता उदास फ़ुले उदास

वाटते आयुष्य अवघे
चार दिवसांचेच झाले

कसे गेले कळले नाही
हाती फ़ार थोडे आले

दोन दिवस आराधनेत
दोन प्रतिक्षेत गेले

अर्धे जीवन प्रयत्नात
अर्धे विवंचनेत गेले

आस हरपलेली असते
श्वास थकले वाटतात

अश्रू बाहेर गळत नाहीत
आत जळत राहतात.

__अनिल [By Anil]

Monday, July 9, 2012

Talya Kathi | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:48 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

तळ्या काठी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा
शोधीत थकून आली असते


जळाआतला हिरवा गाळ
निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान
मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे
जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी
मधूनच वर नसते येत

पंख वाळवीत बदकांचा थवा
वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा
ध्यानभंग होऊ देत नसतो

हृदयावरची विचाराची धूळ
हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते!

__अनिल [By Anil]

Sunday, June 17, 2012

Pawasa | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:49 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.

(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

पावसा

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?


पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्ह्याहाळ डोळे भरून..


_अनिल [By Anil]

Tuesday, May 29, 2012

Aanibaani | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:50 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

आणिबाणी

अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो


वादळ असे भरून आले
तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या
काही सावरणार नव्हते

हरपून जावे भलतीकडेच
इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो इतके
पेटून आले होते रान

असे पडत होते डाव सारा
खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते
जीव पुरा वीटून जावा

कसे निभावून गेलो
कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते
नुसते हाती हात होते!

_अनिल [By Anil]

Monday, March 12, 2012

Lavanya | Anil | Marathi Kavita

Asha-KD - 10:51 AM
Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

लावण्य

असे काहीतरी आगळे लावण्य
केव्हा कधीकाळी दिसून जाते
वेगळ्या सौंदर्य-पर्युत्सुक
जीवा जन्मांतरीचे सांगत नाते


नसते निव्वळ गात्रांची चारुता
त्याहून अधिक असते काही
ठाव त्याचा कधी लागत नाही
आणि आठवण बुजत नाही

रुप रेखेत बांधलेले तरी
मोकळी खेळते त्यातून आभा
डोळ्याआडाच्या दीपज्योतीहून
निराळी भासते प्रकाशप्रभा

आधीच पाहिले पाहिले वाटते
पहिलेच होते दर्शन जरी
स्मरणाच्या सीमेपलिकडले
कुठले मीलन जाणवते तरी

पुन्हा तहानेले होतात प्राण
मन जिव्हाळा धाडून देते
जागच्या जागी राहून हृदय
प्रीतीचा वर्षाव करून घेते!

_अनिल [By Anil]
Previous
Editor's Choice