Tuesday, March 8, 2016

Shwasanchya talawari | Guru Thakur | Marathi Kavita

श्वासांच्या तालावरी

श्वासांच्या तालावरी स्वप्नांचे झुंबर हाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,


हव्यास नव्या दिवसाचा कधी पाठलाग ना सोडी
अन आस उद्याची वेडी थकलेले पाउल ओढी,

ती पहाट नाही दूर अंतरातून कोणी बोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,

झाकल्या मुठीतुन वाळू निसटावी तसेच होते
किती बांधून ठेवू म्हटले आयुष्य फरारी होते,

सरणाच्या फांदीवरही पालवी कोवळी डोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,

पाहिला जाळून तरीही सुंभाचा पीळ सुटेना
जगण्याचा तसाच गुंता गुरफटला जीव निघेना,

उसवावे तरी किती हे गुरफटणे नियमीत झाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

No comments:

Post a Comment