Show Mobile Navigation

Tuesday, July 19, 2011

, , , ,

Majhe Ghar | B B Borkar | Marathi Kavita

Asha-KD - 10:28 AM
Balakrishna Bhagwant Borkar
(Born: 30 November 1910, Died: 8 July 1984)

माझे घर

तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हातरी केव्हातरी
फेसाळल्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरी।

बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर॥

मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड
गर्द हिरवे न्हाणीशी नीरफणसाचे झाड।
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा
त्यात सवत्स कपिला ओल्या चार्‍याचा नि साठा॥

फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार।
आंबा एकादा कलमी यावी म्हणुनिया खार।
गारव्याच्यासाठी काही गार नाजूक पोफळी
नागमोडी त्यांच्यावर पानवेल मिरवेल॥

वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे
शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे।
कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी
पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी॥

असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत
लिहीन मी भावगीते तेथे घुमत घुमत।
आणि येता थोडा शीण बसुनिया गच्चीवर
रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर॥

जाळी फेकणारे कोळी, त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी, त्यांच्या विसाव्याच्या विड्या।
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट
बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट॥

आणि मग सेवीन मी जाईजुईचा गे भात
पोईतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ।
वेताचिया खाटेवर थोडा बागेत दुपारी
झोपेन मी घोळवीत तुझी अमली सुपारी॥

आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा
तुझ्यासंगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा।
कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी
ऐकेन ती समाधाने डोळा घेऊनीया पाणी॥

थंडीवार्‍यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील
काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील।
घरी येताच नातरे आनंदाने म्हणतील
सांगा गोष्ट किंवा म्हणा नवे गाणे॥

रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा
जेणे जाणवेल त्यांना उद्या दुसर्‍याची व्यथा।
मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी
दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी॥

असे माझे गोड घर केव्हातरी केव्हातरी
अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी॥

__ बा. भ. बोरकर

0 comments:

Post a Comment