Show Mobile Navigation
Guru Thakur
Showing posts with label Guru Thakur. Show all posts
Showing posts with label Guru Thakur. Show all posts

Tuesday, March 15, 2016

Arth leuni pahile akshar | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 6:30 PM
अर्थ लेउनी पहिले अक्षर

अर्थ लेउनी पहिले अक्षर
कधी उमटले कळले नाही,
करी घेतला वसा न चुकला
पाउल मागे वळले नाही


सुन्न खिन्न कातर एकांती
सोबत माझी अक्षर झाले
थिजलो जेव्हा सभेत भरल्या
तिथेही धावून अक्षर आले
कुठ्ला हा अनुबंध म्हणावा?
कोडे मजहे सुटले नाही

होऊन अश्रू कधी ओघळ्ले
कधी सांत्वने घेउन आले
रणरणत्या मध्यान्ही वेडा
मेघ होऊनी भिजवून गेले
आली गेली कैक वादळे
विण नात्यांची टिकली नाही

गेली उलटुन युगे अता त्या
अनुबंधासही अंकुर फुटले
प्रश्न अताशा पडे जगाला
मी कुठला अन अक्षर कुठले
परस्परांतच असे मिसळ्लो
नुरले आता विरळे काही

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

Tuesday, March 8, 2016

Shwasanchya talawari | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 5:30 PM
श्वासांच्या तालावरी

श्वासांच्या तालावरी स्वप्नांचे झुंबर हाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,


हव्यास नव्या दिवसाचा कधी पाठलाग ना सोडी
अन आस उद्याची वेडी थकलेले पाउल ओढी,

ती पहाट नाही दूर अंतरातून कोणी बोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,

झाकल्या मुठीतुन वाळू निसटावी तसेच होते
किती बांधून ठेवू म्हटले आयुष्य फरारी होते,

सरणाच्या फांदीवरही पालवी कोवळी डोले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले,

पाहिला जाळून तरीही सुंभाचा पीळ सुटेना
जगण्याचा तसाच गुंता गुरफटला जीव निघेना,

उसवावे तरी किती हे गुरफटणे नियमीत झाले
आशेच्या लयकारीवर जगण्याचा चाळा चाले

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

Sunday, February 28, 2016

Kar have tevadhe waar | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 5:30 PM
कर हवे तेवढे वार

नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो
मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो,


केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो,

रिचवुन सारे तुडुंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही आभार म्हणालो,

खेळवुनी मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडुन तिला तैयार म्हणालो,

रडलो नाही लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन याल्गार म्हणालो

गुरु ठाकूर


Reference: guruthakur.in

Wednesday, October 14, 2015

Ayushyala Dyave Uttar | Guru Thakur | Marathi Kavita

Asha-KD - 10:05 AM
आयुष्याला द्यावे उत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर



नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

गुरु ठाकूर



Reference: guruthakur.in
Previous
Editor's Choice