Show Mobile Navigation
बहीणाबाई चौधरी
Showing posts with label बहीणाबाई चौधरी. Show all posts
Showing posts with label बहीणाबाई चौधरी. Show all posts

Thursday, October 29, 2015

धरित्रीच्या कुशीमधे (Dharitrichya kushimadhe by Bahinabai Chaudhari)

Asha-KD - 9:24 AM
धरित्रीच्या कुशीमधे बियबियाणं निजली,
वर पसरली माती जशी शाल पांघरली

बीय डरारे भूमीत सर्व कोंब आले वर,
गहिवरल शेत जस अंगावरती शहार

ऊनवार्‍याशी खेळता एका एका कोंबांतून,
प्रगटली दोन पान जशी हात ती जोडून

टाळ्या वाजवती पान दंग देवाच्या भजनी,
जशी करती करुणा होऊ दे रे आबादानी

दिसामासा होय वाढ रोप झाली आता मोठी,
आला पिकाला बहर झाली शेतामध्ये दाटी

कशी वार्‍यानं डोलती दाणे आले गाडी गाडी,
देव अजब गारुडी.. देव अजब गारुडी

__ बहीणाबाई चौधरी

Monday, October 12, 2015

माझी माय सरसोती (Majhi Maay Sarosoti by Bahinabai Chaudhari)

Asha-KD - 9:59 AM
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली,
लेक बहिनाच्या, मनी
किती गुपीतं पेरली

माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत,
पावसात समावतं
माटीमधी उगवतं

अरे देवाचं दर्सन
झालं झालं, आपससूक,
हिरिदात सूर्याबापा
दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानांमधी,
देवा तुझं येनंजानं
वारा सांगे कानामधी

__ बहीणाबाई चौधरी

Monday, October 22, 2012

मन वढाय वढाय (Man vadhay vadhay)

Asha-KD - 12:31 PM
मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

__ बहीणाबाई चौधरी

Thursday, September 20, 2012

मानूस (Manus)

Asha-KD - 12:29 PM
मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठी
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठी
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

__बहीणाबाई चौधरी

Friday, August 10, 2012

पेर्ते व्हा

Asha-KD - 12:30 PM
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी

__ बहीणाबाई चौधरी

Sunday, April 15, 2012

अरे संसार संसार (Are sansaar sansaar)

Asha-KD - 12:34 PM
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥

अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥

अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥

ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥

अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥

अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥

__ बहीणाबाई चौधरी

Sunday, January 1, 2012

अरे खोप्यामंदी खोपा (Are khopyamadhi khopa)

Asha-KD - 11:35 AM
अरे खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

__ बहीणाबाई चौधरी
Previous
Editor's Choice