Show Mobile Navigation
ग्रेस
Showing posts with label ग्रेस. Show all posts
Showing posts with label ग्रेस. Show all posts

Wednesday, December 30, 2015

Vakalya disha phulun | Grace | Manikrao Sitaram Godghate | Marathi Kavita

Asha-KD - 7:30 PM
Grace - Manikrao Sitaram Godghate
(Born: 10 May 1937, Died: 26 March 2012)

वाकल्या दिशा फुलून

वाकल्या दिशा फुलून स्‍निग्ध रंग सावळा,
या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा


पावले अशी सलील नादती कुठून नाद,
मी क्षितिज वाहतो तरी जुळे न शब्द, गीत

दु:ख एक पांगळे जशी तरूंत सावली,
या उरांत पेटलीस, का उन्हास काहिली

असे कसे सुने सुने मला उदास वाटते,
जशी उडून पाखरे नभांत चालली कुठे

ग्रेस [Grace - Manikrao Sitaram Godghate]

Friday, November 13, 2015

त्या व्याकुळ संध्यासमयी (Tya wyakul sandhya samayi by Grace)

Asha-KD - 8:00 AM
त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो

तू आठवणींतुन माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी

पदराला बांधुन स्वप्‍ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई

तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा,
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाऊस यावा

ग्रेस

Wednesday, November 11, 2015

ती गेली तेव्हा (Ti Geli Tevha by Grace)

Asha-KD - 9:24 AM
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता

ग्रेस

Saturday, October 31, 2015

भय इथले संपत नाही (Bhay Ithale Sampat Nahi by Grace)

Asha-KD - 8:51 AM
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया,
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे,
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

ग्रेस

Monday, October 26, 2015

तुला पाहिले मी (Tula pahile mi by Grace)

Asha-KD - 10:00 PM
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे,
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे!

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली,
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे,
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते?
जसे संचिताचे ऋतू कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा,
तमांतूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा

_ ग्रेस

Saturday, October 17, 2015

घर थकलेले संन्यासी (Ghar thaklele sanyasi by Grace)

Asha-KD - 10:20 AM
घर थकलेले संन्यासी
हळूहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले
नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती
ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे
असतेच झर्‍याचे पाणी

मी भिऊन अंधाराला
अडगळीत लपुनी जाई
ये हलकेहलके मागे
त्या दरीतली वनराई

ग्रेस

Monday, October 12, 2015

पाऊस कधीचा पडतो (Paus Kadhicha Padato by Grace)

Asha-KD - 9:30 PM
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यांत उतरते पाणी
पाण्यावर डोळे फिरती,
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला,
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा,
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

ग्रेस

Saturday, October 10, 2015

डहाळी (Dahali by Grace)

Asha-KD - 10:12 AM
किरमिजी वळणाचा धुंद पाऊस येतो
निळसर कनकांचे दीप हातात देतो

हृदय सजविणारा मित्र नाही उशाशी
घरभर घन झाले आत ये ना जराशी

नितळ मधुर माझे भास सारे कशाने?
सहज तरल व्हावे देह्साक्षी जडाने

वणवण फिरणारा मांड दारात वारा
सरळ झडप घेतो पक्षि सोडून चारा

गगन गहन होई प्रार्थनांच्याप्रमाणे
सतत घुमविणारी हाक येई पुराने

तुजसम बुडविणारी एक छाया दिसेना
स्वरविण वतनाची दुक्ख साधे रचेना

मधुर विजनवासी उंच त्याचा पिसारा
बुडत बुडत गेल्या रुद्रवर्षेत तारा

पदर पिळुनी चोळी वाळवावी निराळी
म्हणुनी धरुनी हाती चंदनाची डहाळी.

ग्रेस

वार्‍याने हलते रांन (Varyane halate raan by Grace)

Asha-KD - 9:12 AM
वार्‍याने हलते रांन, तुझे सुनसान
हृदय गहिवरले,
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईंतले

डोळ्यांत शीण हातात वीण
देहांत फुलांच्या वेगी,
अंधार चुकावा म्हणुन निघे बैरागी

वाळूंत पाय सजतेस काय
लाटान्ध समुद्राकांठी,
चरणांत हरवला गंध
तुझ्या की ओठी

शून्यात गर्गरे झाड तशी ओढाळ दिव्यांची नगरी,
वक्षांत तिथीचा चांद तुझा की वैरी

ग्रेस

Thursday, October 8, 2015

घनकंप मयूरा (Ghankamp Mayura by Grace)

Asha-KD - 9:59 AM
घनकंप मयूरा,
तुला इशारा,
खोल पिसारा,
प्राण आडवा पडे,
तू वळशिल माझ्याकडे ?

घनसंथ मयूरा,
धूळ दरारा,
कुठे पुकारा,
तीक्ष्ण नखांची दीप्‍ती,
गीतांतुन गळते माती

घननीळ मयूरा,
रंग फकिरा,
तुला पहारा?
कातडे वाळत्या वेळी,
ते भीषण ऊन कपाळी

घनदंग मयूरा,
नको सहारा,
हलका वारा,
बिंदीत चंद्र थरथरते,
ती वस्‍त्र कुठे पालटते
[चंद्रमाधवीचे प्रदेश]

_ ग्रेस

Thursday, November 8, 2012

पाठीवर बाहुलीच्या (Pathiwar Bahulichya)

Asha-KD - 11:41 AM
पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली

- ग्रेस

Saturday, September 29, 2012

बया (Baya)

Asha-KD - 12:45 PM
दूर डोंगरांची घळ
तिथे आहे शिवालय,
अशा भासाने गोंदते
बया बदकांचे पाय

देवबाभलीचा काटा
त्याला हळदीचा डंख,
पायी स्वस्तिक कोरता
हाती बदकांचे पंख!

डबक्यातून बदके
येती चालत गावाला,
तशी स्वस्तिकांची माळ
झोंबे शिवाच्या पायाला

बया! काय म्हणायचे ?
नाव तिचे ना विरक्ती ?
सत्य मांडताना बाई
थोडी लागते आसक्ती!

तरी सुगाव्याचे भूत
बसे तिच्या मानगुटी,
शिवालयातील घंटा!
नाद तिच्याही ललाटी|

__ ग्रेस

Tuesday, May 1, 2012

ही माझी प्रीत निराळी (Hi majhi prit nirali)

Asha-KD - 12:43 PM
ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी

__ ग्रेस

Tuesday, April 24, 2012

जीव राखता राखता (Jeev rakhata rakhata)

Asha-KD - 12:42 PM
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन,
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा,
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन,
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना,
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी,
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन,
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल,
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग,
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल,
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

__ ग्रेस
Previous
Editor's Choice